नागपूर ब्युरो : विदर्भात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपिटीनंही तडाखा दिला. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पिकांचे नुकसान झाले. आता पंचनामे होणार काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तसेच पावसामुळं हवेत गारठा निर्माण झाला. यामुळं पिकांचं नुकसान होत आहे.
नरखेड तालुक्यात अवकाळी पावसानं नुकसान झालंय. यापूर्वी पावसानं खरीपाचं नुकसान केलं. आता अवकाळी पावसानं व गारपिटीनं शेतातील पिकांचं नुकसान झालंय. जलालखेडा परिसरात काही शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालंय. तुरीलाही या पावसाचा फटका बसला. गहू हे पीक जोमात होतं. अशात आलेल्या पावसानं गहू वाकलं. गारपिटीमुळं संत्राही गळून पडला. भाजीपाला पिकाचंही या पावसात नुकसान झालं. पावसामुळं गारठ्यात वाढ झाली आहे. आंबा बहारावरही या वातावरणाचा फटका बसणार आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणा दरम्यान दुपारी 5 वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील घोगरा आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीनंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. तर रब्बी धान पिकाचे नुकसान होणार आहे. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथीचे रोग डोके वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी 11 च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले. पाऊस सुरू असताना छोट्या आकाराची गारही पडली. वेचणीस आलेला कापूस पाण्यात भिजला. शेतकरी-मजुरांची त्रेधातिरपट झाली. चना, गहू, तूर पिकांचं नुकसान झालंय. आणखी दोन दिवस शेतकऱ्यांना अलर्ट राहावे लागणार आहे.