Home Maharashtra नववर्ष स्वागतासाठी नवी नियमावली : सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडू नका, सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई

नववर्ष स्वागतासाठी नवी नियमावली : सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडू नका, सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई

568

राज्यात ओमायक्रॉनप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 167 ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

31 डिसेंबर 2021 रोजी अत्यंत साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे सांगितले आहे. नक्की राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घेऊया? ​​​​

नियमावली काय आहे?

  • 31 डिसेंबर रोजी आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नका. घरीच साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करा.
  • 25 डिसेंबरपासून रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे पालन करावे.
  • 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी असेल.
  • कार्यक्रमांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळा.
  • 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
  • मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाट्यांवर नागरिकांनी गर्दी करू नये.
    नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुका काढू नयेत.
  • नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे.