कोरोनाचा सर्वाधिक सांसर्गिक ओमायक्रॉन व्हेरिएंट द. आफ्रिकेतून १२७ देशांत पसरला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आफ्रिकेत रोज आढळणारे रुग्ण ५०% पर्यंत घटले आहेत. ही लाट एकाच महिन्यात ओसरली. तेथील शास्त्रज्ञांनी नवे संशोधन केले असून ते ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले. त्याचे निष्कर्ष आशा पल्लवित करणारे आहेत. ओमायक्रॉन संसर्गितांत विषाणूच्या प्रवेशानंतर ताबडतोब अँटिबॉडी तयार होऊ लागतात.
त्या गंभीर आजारी पडू देत नाहीत. याच कारणामुळे केवळ १% लोकांनाच विशेष औषधीची गरज भासली. संशोधनावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिनचे विभागप्रमुख प्रा. जुगलकिशोर म्हणाले, ‘चांगली गोष्ट म्हणजे ओमायक्रॉननंतर टी सेल्समध्ये अँटिबॉडीज बनत आहे. परंतु आपण निष्काळजीपणाने वागू नये.’
कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच शुक्रवारी रात्री देशभरात नवे वर्ष सुरू झाले आणि तेही निर्बंधांतच. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी जल्लोष करण्यास बंदी घातली. त्यामुळे लोकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागले. महाराष्ट्राने नवे दिशानिर्देश लागू केले. यानंतर राज्यात बंद किंवा मोकळ्या जागेत ५० पेक्षा जास्त लोक जमण्यास मनाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी शुक्रवारपासून १५ जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केले. याद्वारे बीचवर जाणे, मैदान, पार्कवर जाण्यास बंदी केली.
केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, २४ तासांत कोरोनाचे १६,७६४ नवे रुग्ण आढळले. तसेच ओमायक्रॉनचे रुग्ण वाढून १३१९ झाले आहेत. देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दुसरा मृत्यू झाला. राजस्थानातील उदयपूर येथील ७३ वर्षीय वृद्ध हायपरटेन्शन आणि मधुमेहाने पीडित होते. २१ रोजी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला होता. परंतु २५ रोजी ओमायक्रॉनने बाधित आढळले. चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. दिनेश खराडी यांनी सांगितले की, या वृद्धाचा मृत्यू शुक्रवारी झाला आहे.