Home मराठी मंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार

मंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार

505

पुणे ब्युरो : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोरेगाव भीमाच्या लढाईतील शुरांना अभिवादन करतो, इथला इतिहास स्मरणात राहील. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर, कोरोना रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील. गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं अजित पवार म्हणाले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

मुंबईत पुणे मुबंईत कोरोनाचे आकडे वाढत आहेत, या शहरात आकडे वाढले की इतर ठिकाणी त्याचा प्रसार होतो, असं अजित पवार म्हणाले. इथले आकडे पाहून कटू निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेत अजित पवार यांनी दिले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांडेवाडीतील बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा स्थगिती दिली होती. शर्यतीच्या घाटावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी घाटावर येऊ नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा विचार करून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली जावी, अशी भूमिका घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले. बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये निराशा पसरलीय.