Home मराठी माय गेली! : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन, आज दुपारी पुण्यात...

माय गेली! : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन, आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार

530

शेकडो अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली घेत आधार देणाऱ्या आणि त्यांची ‘माय’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (७४) यांचे मंगळवारी रात्री ८ वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे कन्या ममता, नातेवाईक सुरेश वैराळकर यांच्यासह मोठा परिवार आहे. सिंधुताईंच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी बारा वाजता पुण्यात ठोसर पागा येथे महानुभाव पंथीयांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती सुरेश वैराळकर यांनी दिली. त्याआधी दहा वाजता त्यांचे पार्थिव मांजरी येथील आश्रमात ठेवले जाईल, असेही वैराळकर म्हणाले. सिंधुताई गेल्या दीड महिन्यापासून गॅलेक्झी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सिंधुताई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

जीवनकार्यावर चित्रपटनिर्मिती
सिंधुताईंच्या या कार्याचा गौरव नुकताच केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान प्रदान करून केला होता. डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना लाभले होते. त्यांच्या जीवनकार्यावर ‘अनाथांची यशोदा’ हा अनुबोधपट आणि ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाची निर्मितीही झाली होती.

बालसदन संस्थेची स्थापना
सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह लावण्यात आला. समाजातील अनाथ, निराधार मुलांविषयीचा कळवळा दाटून त्या समाजकार्याकडे वळल्या. त्यांनी बालसदन या संस्थेची स्थापना करून शेकडो अनाथांचा सांभाळ केला.

‘मुलांची परवड होऊ देऊ नका, त्यांना नीट सांभाळा’
‘माझी मुलं कशी आहेत, त्यांना व्यवस्थित सांभाळा. त्यांची परवड होऊ देऊ नका.!’ हे माईंचे अखेरचे उद्गार. शेवटपर्यंत ती मुलांचाच विचार करीत होती. तीन दशके सोबत काम करणाऱ्या सिंधुताईंच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांनी आपल्या लाडक्या ‘माई’विषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे –

  1. बाल निकेतन हडपसर, पुणे
  2. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
  3. अभिमान बाल भवन, वर्धा
  4. गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
  5. ममता बाल सदन, सासवड
  6. सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे