Home मराठी #Nagpur | मराठी राज्याच्या उपराजधानीत मराठीला महानगरपालिकेकडून दुय्यम वागणूक

#Nagpur | मराठी राज्याच्या उपराजधानीत मराठीला महानगरपालिकेकडून दुय्यम वागणूक

648

श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्र लिहून मागितला खुलासा

नागपूर ब्युरो : नागपुरातील अंबाझरी तलावाजवळील विवेकानंद स्मारकासंदर्भात दृकश्राव्य निवेदन महानगरपालिका सुरू करणार आहे. ते पुढे मराठीत देखील सुरू करणार आहे, असे वक्तव्य करण्यात आले, ते अतिशय संतापजनक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.

मराठी राज्यात मराठी देखील, हा काय प्रकार आहे व मराठी राज्याच्या उपराजधानीत मराठीला महानगरपालिका दुय्यम कशी लेखू शकते? प्राधान्याने ते राजभाषा मराठीत का नाही असे प्रश्न मराठीसाठी चळवळ करणारे व भाषाप्रेमींना पडले असून मराठी भाषेवर उपकार करण्याच्या भावनेसारखी विधाने कशी व का केली जाऊ शकतात? असा सवाल जोशी यांनी केला आहे.


केंद्र व राज्यांचे सार्वजनिक ठिकाणी भाषा वापराच्या अधिनियमानुसार प्रथम राजभाषा, नंतर हिंदी व त्यानंतर इंग्रजी हा क्रम सुस्पष्ट असतांनाच तो का डावलला जातो आहे याचा कृपया खुलासा व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांना पत्र लिहून केली आहे.

पत्राच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालक मंत्री, आमदार, तसेच संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. राज्याच्या मराठी भाषा मंत्र्यांना देखील या प्रकरणी हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे. संबंधित निवेदन हे अग्रकमानेच मराठीत असणे आवश्यक आहे व ते तसे होईल हे कृपया आम्हाला आश्वासित करावे व तसे कळवावे ही अपेक्षा देखील पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.