विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि., अलका शेअर्स सर्व्हिसेस, जे.एम फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय आस्थापनांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करवून घेण्यात आली. मात्र त्याचा परतावा न देता सुमारे ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केल्याप्रकरणी संबंधित वित्तीय आस्थापनेचा संचालक विशाल अंबादास फटेसह त्याची पत्नी राधिका, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे, आई अलका फटे (सर्व रा.अलिपूर रोड, माउली चौक, बार्शी, जि. सोलापूर) अशा पाच जणांविरोधात भादंवि ४०९, ४१७, ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण )अधिनियम १९९९ नुसार बार्शी शहर पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेले गुंतवणूकदार दीपक बाबासाहेब अंबारे (३७, रा. शेळके प्लॉट, गाडेगाव रोड, बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात फसवणूक झालेल्या आणखी ३४ गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दिल्याने फसवणुकीची एकूण रक्कम सायंकाळपर्यंत ११ कोटी ३८ लाख ३५ हजारांपर्यंत गेली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या जास्त असून कायदेशीर विचारविनिमय करून गुंतवणूकदार तक्रार देण्याचे धाडस दाखवत असून फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अंबारे यांच्या फिर्यादीनुसार, सन २०१९ पासून आजपर्यंत विशाल फटे याने विशाल, अलका व जे.एम या वित्तीय आस्थापना स्थापन करून त्यामध्ये त्याचे वडील अंबादास, भाऊ वैभव तसेच आई अलका फटे यांना संचालक करून या आस्थापनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता आमिष दाखवून गुंतवणूक केलेली रक्कम वेगवेगळया कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे, असे आश्वासन दिले.
त्यामुळे अंबारे यांनी ९६ लाख २५ हजार, त्यांचा भाऊ किरण अंबारे ५० लाख, मित्र संग्राम मोहिते ३ कोटी ६० लाख २० हजार रुपये, रोहित व्हनकळस (रा. अलिपूर रोड) ३५ लाख, सुनील जानराव (रा. उपळाई रोड, बार्शी) २० लाख, हनुमंत ननवरे (रा. झाडबुके मैदान, बार्शी) २ लाख अशी एकूण ५ कोटी ५३ लाख २५ हजार रुपये गुंतवणूक करण्यात आली. तसेच जी.एम. फायनान्स सर्व्हिसेस या कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून एचडीएफसी बँकेत बनावट खाते उघडले गेले. यातही गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या रकमांची गुंतवणूक करून घेतली. विशाल याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर १० लाख रुपये गुंतवल्यास वर्षभर परतावा न देता वर्षअखेरीस ६ कोटी रुपये दिले जातील, असे पत्रक टाकून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. पण गुंतवणूक केलेली रक्कम, कोणताही परतावा न देता फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला आहे.