Home Business सोशल मीडियावर शेअर बाजाराच्या टिप्स; सेबीने 6 जणांवर घातली बंदी

सोशल मीडियावर शेअर बाजाराच्या टिप्स; सेबीने 6 जणांवर घातली बंदी

525

2.84 कोटी रुपये परत करण्यासही सांगितले

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) या बाजार नियामकाने टेलिग्राम आणि व्हाॅट्सअॅप ग्रुपद्वारे शेअरच्या किमती वाढवण्यासाठी स्टाॅक-टिप्स दिल्याच्या प्रकरणात कारवाई केली आहे. सेबीने सोशल मीडिया समूहांद्वारे शेअरच्या शिफारशी करून फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतीत सहभागी असलेल्या सहा जणांना प्रतिभूती बाजारातून प्रतिबंधित केले आहे. सेबीने हिमांशू महेंद्रभाई पटेल, राज महेंद्रभाई पटेल, जयदेव जाला, महेंद्रभाई बेचारदास पटेल, कोकिलाबेन महेंद्रभाई पटेल आणि अवनीबेन किरणकुमार पटेल यांच्यावर बंदी घातली आहे. सेबीने त्यांना अनुचित प्रकारे मिळवलेले 2.84 कोटी रुपये परत करण्यासही सांगितले आहे.

सेबीने म्हटले की, ‘बुलरन २०१७’ या टेलिग्राम चॅनलशी जवळपास ५२,००० लोक जोडलेले होते. प्राथमिकदृष्ट्या त्याचे संचालन हिमांशू, राज आणि जयदेव करत होते आणि लहान कंपन्यांच्या शेअरबाबत सल्ला देत होते. त्यांची सेबीत नोंदणीही नाही, अशा तक्रारी सेबीला मिळाल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये सेबीने त्याची चौकशी सुरू केली होती. सेबीच्या चौकशीत ‘बुलरन २०१७’ हे टेलिग्राम चॅनल, ‘बुलरन इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनल चॅनल’ आणि ‘स्टाॅक गुजराती ३’ या व्हाॅट्सअॅप ग्रुपची माहिती मिळाली. त्यांचे जवळपास ५०,००० ग्राहक होते.