Home Omicron #Nagpur | मॉल, दुकाने, बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर उदयापासून पोलिस सक्त कारवाई...

#Nagpur | मॉल, दुकाने, बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर उदयापासून पोलिस सक्त कारवाई करणार

549

पालकमंत्र्यानी घेतला आढावा ; हॉकर्स झोन मधील बेपर्वाईवर व्यक्त केली चिंता

बाजार, व्यापार, सुरु ठेवायचे असल्यास प्रत्येक चेहऱ्यावर मास्क अनिवार्य

ऑटोचालक, वाहनचालक, न्यूजपेपर व्हेंडर्स, दुधवाले यांना दोन्ही लसी आवश्यक

मास्कच्या अधिक वापरासाठी प्रभाग निहाय “आरोग्य मित्र” सक्रीय करणार

नागपूर ब्युरो : नागपूर जिल्ह्यात रुग्णवाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे बाजारातील विना मास्क गर्दी कमी होत नाही. त्यामुळे मॉल असो, दुकान असो, की हॉकर्स यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर मास्क असला पाहिजे. नसेल तर दोन्हींवर कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. उद्यापासून पोलिसांकडून याबाबत सक्त कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर ग्रामीण भागातील दौऱ्यानंतर पालकमंत्री डॉ.राऊत यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीला सुरुवात करतानाच दररोज दोन हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता बि.डी.सोनवणे, डॉ सागर पांडे, यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ व टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना बर्डी सारख्या बाजार पेठेतील गर्दी धोकादायक आहे. प्रत्येक दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असले पाहिजे. दुकान मालकांनी अशाच कामगारांना दुकानात काम करू दयावे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे देखील दोन्ही लसी पूर्ण असल्या पाहिजे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क घालणे अनिवार्य आहे. नसेल तर दुकानात प्रवेश करताना मास्क देण्याची जबाबदारी दुकानदारावर सोपवा. विना मास्क काम करणाऱ्या हॉकर्सवर सक्तीने कारवाई करा. उद्यापासून प्रमुख बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढवण्याचे निर्देश या वेळी पालकमंत्र्यांनी दिले.

सुपर स्प्रेडर म्हणून सर्वाधिक संपर्क येणारे ऑटोचालक, खाजगी बस चालक, वाहक, दुकानदार, हॉकर्स, न्यूज पेपर वेंडर्स, डीलीव्हर बॉय या सर्वांना दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र स्वतः जवळ बाळगणे अनिवार्य करा. वारंवार बाहेर पडायचे असेल तर लसीकरण आवश्यक आहे. बाजार सुरू ठेवायचा असेल तर प्रत्येक तोंडाला मास्क आवश्यक आहे. जिल्ह्यात, तालुक्यात आणि शहरामध्ये प्रभाग निहाय आरोग्यमित्र करून लोकांमध्ये मास्क वाढविण्याची सवय लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या गाड्यांची सद्यस्थिती याबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. नागरिकांनी औषधांचा साठा,ऑक्सिजनची उपलब्धता, वैद्यकीय मनुष्यबळ, बेडची उपलब्धता, याबाबत चिंतित होऊ नये. आरोग्य यंत्रणा सक्रिय आहे. सर्व उपाय योजना आहेत. मात्र गरज नसताना बाहेर पडू नये, मास्क शिवाय बाहेर पडणे धोकादायक आहे, हे जाणून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

@kvicindia | खादी बाजार प्रदर्शनी में युवाओं ने बिखेरा फैशन का जलवा