Home Maharashtra कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत कोणताही बदल नाही : अजित पवार

कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत कोणताही बदल नाही : अजित पवार

526

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या प्रतिबंधात्मक नियमावलीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यात आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेतले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले. पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील अवसरी येथील जम्बो रुग्णालय सज्ज करण्यात आले असून तेथे कर्मचारी भरतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास त्याचा निश्चितच उपयोग केला जाईल, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेतच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पहिला डोस घेतलेल्या मुला-मुलींचे प्रमाण वाढत आहे. कोविडपासून बचावासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९ हजार २७० कारवायांत ४५ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत असल्याचेही पवार म्हणाले.

पुणे जिल्हा बँक निवडणुकीनंतर कोणाकडे कोणता पदभार सोपावण्यात आला याविषयी तसेच राज्यातील निर्बंधांविषयी बोलताना पवार म्हणाले, नागरिकांच्या जिवाशी खेळ करून चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारने सुरू केली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख चक्क ‘मुख्यमंत्री’ असा केला गेला. पवार यांना हे विधान लक्षात आणून दिले असता त्यांनी मी माझे शब्द मागे घेतो, असे सांगत त्यांनी आपल्या चुकीच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.