नागपूर ब्यूरो : पालकांच्या सहमतीने कोरोना नियमांचे संपूर्ण पालन तसेच सविनय कायदेभंग करीत उद्या सोमवार १७ जानेवारीपासून महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशनच्या राज्यभरातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मेस्टाचे डॉ. निशांत नारनवरे यांनी दिली आहे. संपूर्ण राज्यात मेस्टाच्या १८ हजार शाळा असून त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता डाॅ. नारनवरे यांनी व्यक्त केली.
नागपूर जिल्ह्याची सभा न्यू अपोस्तोलिक इंग्लिश स्कूल कुकडे, लेआउट येथे पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा होऊन मुख्य मुद्द्यावर ठराव घेण्यात आला. यात सोमवार १७ जानेवारीपासून पालकांच्या सहमतीने शाळा सुरू करून सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भात शाळांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केल्यास शाळा व पालक जशास तसे उत्तर देतील असे ठरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजाभाऊ टाकसाळे, खेमराज खोंडे, कपील उमाळे, अरुणा किरणापुरे, प्रशांत शेंडे, लल्लन मेहता, हरीश वरुडकर, अपर्णा पेंटा, डॉ. वंदना बेंजामिन उपस्थित होते.