Home कोरोना कोरोना काळात 1.47 लाख मुलांनी गमावले पालक; यामध्ये 76 हजार मुले आणि...

कोरोना काळात 1.47 लाख मुलांनी गमावले पालक; यामध्ये 76 हजार मुले आणि 70 हजार मुली

589

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, एप्रिल 2020 पासून देशातील 1 लाख 47 हजार 492 मुलांनी कोरोना आणि इतर कारणांमुळे त्यांचे एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत. यामध्ये 76,508 मुले, 70,980 मुली आणि 4 ट्रान्सजेंडर मुलांचा समावेश आहे.

NCPCR ने सांगितले की, त्यांचा डेटा बाल स्वराज पोर्टल-कोविड केअरवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. आयोगाने म्हटले आहे की, 11 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 पासून देशात 10,094 मुले अनाथ झाली आहेत, 1 लाख 36 हजार 910 मुलांनी पालक गमावले आहेत आणि 488 मुलांना त्यांच्या पालकांनी सोडून दिले आहे. एकूण ही संख्या 1,47492 आहे.


अहवालातील इतर ठळक मुद्दे-

या मुलांमध्ये सर्वाधिक 59,010 मुले 8 ते 13 वयोगटातील आहेत. त्यापाठोपाठ 14 ते 15 वयोगटातील 22,763 मुले आहेत. 16 ते 18 वयोगटातील 22,626 आणि 4 ते 7 वर्षे वयोगटातील 26,080 मुले आहेत.
यापैकी 1,25,205 मुले त्यांच्या पालकांसोबत आहेत, 11,272 मुले कुटुंबातील सदस्यासोबत राहत आहेत, तर 8,450 मुले इतर पालकांच्या देखरेखीखाली आहेत. 1,529 मुले बालगृहात, 19 मुले निवारागृहात, 2 मुले निरीक्षण गृहात, 188 अनाथाश्रमात, 66 मुले विशेष दत्तक संस्थेत आणि 39 मुले वसतिगृहात आहेत.

यामध्ये ओडिशातील 24,405 मुले, महाराष्ट्रातील 19,623 मुले, गुजरातमधील 14,770 मुले, तामिळनाडूतील 11,014 मुले, उत्तर प्रदेशातील 9,247 मुले, आंध्र प्रदेशातील 8,760 मुले, मध्य प्रदेशातील 7,340 मुले, पश्चिम बंगालमधील 6,835 मुले, दिल्लीतील 6,835 मुले आणि राजस्थानमध्ये 6,827 मुले आहेत.
आयोगाने म्हटले आहे की, या साथीच्या रोगाचा मुलांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. या संदर्भात, राज्य आयोगाशी झालेल्या आभासी बैठकीत आयोग मुलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या तयारीचा आढावा घेत आहे.