कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या लाटेत लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत १५ दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली.
दुसरीकडे, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) आजपासून (१७ जानेवारी) संलग्नित १८ हजार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजयराव तायडे पाटील यांनी रविवारी ही माहिती दिली. यामुळे शाळांच्या मुद्द्यावरून तिढा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, संघटनेशी संलग्न असलेल्या काही सदस्यांनी अद्याप आमचे काही ठरले नाही, अशीही भूमिका घेतली आहे.
आमच्या विनंत्यांकडे सरकारचे दुर्लक्ष : मेस्टा
मेस्टानुसार विद्यार्थी २ वर्षांपासून घरी आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आता समोर येत आहेत. शिवाय कोरोना संसर्गाचे प्रमाण मुलांमध्ये कमी आहे. हे लक्षात घेता आम्ही राज्य शासनाला वारंवार विनंती केली, चर्चा केल्या. मात्र, शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही सोमवारपासून मेस्टाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : सविनय कायदेभंग करत शाळा उघडणार
जिल्ह्यात पालकांच्या सहमतीने कोरोना नियमांचे संपूर्ण पालन तसेच सविनय कायदेभंग करीत सोमवार, १७ जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचा दावा मेस्टाचे डॉ. निशांत नारनवरे यांनी केला. यासंदर्भात शाळांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केल्यास शाळा व पालक जशास तसे उत्तर देतील, असेही ठरल्याचे ते म्हणाले.