Home Azadi Ka Amrit Mahotsav पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करुन पतीनेही केली आत्महत्या, नागपुरातील घटना

पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करुन पतीनेही केली आत्महत्या, नागपुरातील घटना

681

थकित कर्जामुळे पतीने आपल्या दोन लहान मुलांची आणि पत्नीची निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पत्नी आणि मुलांचा हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली आहे. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दयानंद पार्क येथील एकाच घरातील चौघे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.

मदन अग्रवाल (वय 40), त्यांची पत्नी किरण (वय 33) व मुलगा ऋषभ (वय 10) आणि मुलगी टिया (5 वर्षे) यांचा मृतात समावेश आहे. सोमवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सायंकाळपर्यत अग्रवाल यांच्या घरातील कोणीच बाहेर न आल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटना उघडकीस आली.

पोलिसांनी पंचांसमक्ष दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता अग्रवाल यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडले होते.

थकित कर्जामुळे टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन अग्रवाल यांचा चायनीजचा ठेला होता. मात्र प्रचंड थकित कर्जामुळे ते गेल्या काही आठवड्यांपासून तणावात होते. त्यातूनच पत्नी व मुलांना बेशुद्ध करीत नंतर चाकूने वार करीत त्यांना ठार केले. नंतर पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.