नागपूर ब्यूरो : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केलीय. तर, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचं, नितीन गडकरी म्हणाले आहे. भाजप नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन देखील केलं जाण्याची शक्यता आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर टीका
‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.