मुंबई ब्युरो : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘मोदींना मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य पटोले यांनी केलंय आणि त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर पटोले यांनी आपल्या वक्तव्याबाबत सावरासावरही केलीय. मात्र, भाजप नेत्यांकडून पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळिक यांनी पटोलेंची मानसिक स्थिती बिघडल्याचं सांगत 1 हजार 1 रुपयाची मनी ऑर्डर करणार असल्याचं म्हटलंय. तर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंविरोधात पोलिसांत तक्रार करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना ईलाजासाठी 1 हजार 1 रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत, अशी खोचक टीका जगदीश मुळीक यांनी केलीय.
तसंच ‘नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न….आज नाना पटोले यांनी आज केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे. त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे. नाना पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत’, असा सल्लाही मुळिक यांनी दिलाय.
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पटोले यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय. तसंच देशद्रोह करणे, पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करणं, लोकांना उकसवणं, पंतप्रधानांच्या जीवाला धोका होईल अशी वर्तणूक करण्याचं काम पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर देशद्रोहाचा आणि लोकांना उकसवण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बावनकुळे यांनी केलीय.