काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो या वादग्रस्त वक्तव्यावरुन भापज नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक भाजप नेत्यांनी नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता या वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.
मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेल्या कामाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. अमृता फडणवीसांनी हिंदीत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले, ‘सूरज को डूबाने का इरादा रखते है कुध नन्हे पटोले! पर इल्म नही है उन्हें के इस प्रगती की रोशनी को बुझाने की होड मे, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले’.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नाना पटोले रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारा येथे गेले होते. त्यादिवशी त्यांच्या निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी विविध सभा घेतल्या. याच वेळी मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
दरम्यान, नाना पटोले यांनी ट्विट करत, ‘माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल केला जात असून मी हे वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत’, असल्याचे स्पष्ट केले आहे.