खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या व तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी सुरू करण्यात आलेली जीवन अमृत रक्तपेढी (ब्लड ऑन कॉल) ही सेवा मार्चअखेर बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयातील रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या नशिबी रक्तासाठी पुन्हा धावपळ येणार आहे. शिवाय ही सुविधा बंद केल्याने यात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यंावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
खासगी रुग्णालयात दाखल आणि रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णाला सहजतेने रक्तपिशवी उपलब्ध व्हावी, रक्त मिळवताना रुग्णाच्या नातेवाइकाची धावपळ आणि फरफट होऊ नये यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात “ब्लड ऑन कॉल’ ही सुविधा जीवन अमृत रक्तपेढी या नावाने सुरू केली होती. यात १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून रुग्णाचे नातेवाईक आपला जिल्हा, रुग्णालय अशी माहिती देऊन रक्त पिशवी मागवू शकत होते. सुरुवातीला किरकोळ प्रक्रिया शुल्क आकारून रक्तपुरवठा केला जात असे. आता हा रक्तपुरवठाही मोफत होत होता.
या सेवेमुळे राज्यात हजारो रुग्णांना लाभ झाला होता. दरम्यान, कोविडकाळात या सुविधेची मागणी घटली. राज्यातील पुणे, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये तर योजनेला शून्य प्रतिसाद मिळाला. इतर िजल्ह्यांमध्येही फार मोठा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाढता खर्च पाहता ही योजना मार्चअखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी याबाबतचे परिपत्रक काढले गेले होते. ते गुरुवारी रुग्णालयांना मिळाले आहे. दरम्यान, ही सेवा बंद होणार असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे.