फिकीतर्फे बिटूकॉन 2020 कार्यक्रमात मार्गदर्शन
नागपूर : रस्त्यांचे बांधकाम करताना दर्जा उत्तम ठेवून बांधकामाचा खर्च कमी करा. तसेच डांबरी रस्ते बांधताना 10 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची हमी घेतली तरच भविष्यात डांबरीकरण परवडेल असे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
फिकीतर्फे बिटूकॉन 2020 या कार्यक्रमात विविध कंत्राटदारांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले, रस्ते बांधकामाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. बर्याच अंशी आम्ही यात यशस्वीही झालो आहोत. पण बांधकामाचा खर्च कमी करताना बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड आम्ही केलेली नाही. डांबरी रस्ते बांधकाम करणार्या कंत्राटदार कंपन्यांनीही बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक वाटल्यास जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करावा पण बांधकामाच्या खर्चात बचत करावी असेही ते म्हणाले.
4500 कोटी रुपयांची बचत
यावेळी ना. गडकरी यांनी लदाख-लेह या दरम्यान बांधल्या जाणार्या जोजिला बोगद्याचा खर्च कमी केल्याचे उदाहरण दिले. या बोगद्याच्या बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून 4500 कोटी रुपयांची बचत केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूल बांधतानाही नवीन तंत्राचा वापर करून खर्चात 25 टक्के बचत करणे शक्य आहे. महामार्ग बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आतापर्यंत 80 लाख मेट्रिक टन फ्लाय अॅशचा वापर केला आहे. सध्या औष्णिक ऊर्जा केंद्राच्या 50-60 किमी परिसरात फ्लाय अॅशचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता फ्लाय अॅश सहज उपलब्ध होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
10 वर्षांची हमी घेणार्या कंपनीला काम
डांबरीकरणाचे रस्ते 5 वर्षात खराब होतात. पाऊस जास्त असलेल्या भागात डांबरीकरणाचे रस्ते अधिक लवकर खराब होतात. त्यामुळे डांबरीकरणाच्या रस्त्यांची आता देखभाल दुरुस्तीसह 10 वर्षांची हमी घेणार्या कंपनीला काम मिळेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून डांबरीकरणाचे रस्ते 10 वर्षे खराब होणार नाहीत, याबद्दल या कंपन्यांनी आता विचार करावा. तसेच रस्ते बांधकाम करताना लागणारी माती आणि मुरुम ही परिसरातील तलाव, तळे, नद्या, नाले यांचे खोलीकरण करून त्यामधून प्राप्त करावा, जेणेकरून रस्ता बांधकामासोबत जलसंधारण देखील होईल. अशा प्रकारचे काम बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे याला बुलडाणा पॅटर्न असे दिलेले आहे. पुलांचे बांधकाम करताना स्टील ऐवजी स्टील फायबरचा उपयोग केल्यास खर्चात बचत होते. डांबरीकरणाचे रस्ते बांधताना नवीन संशोधनाचा उपयोग करावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.