Home मराठी प्रजासत्ताकदिनी देशाच्या सहा राज्यांमध्ये एकसाथ निनादणार राष्ट्रगीताचा सूर

प्रजासत्ताकदिनी देशाच्या सहा राज्यांमध्ये एकसाथ निनादणार राष्ट्रगीताचा सूर

460
“हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन साजरा केला जाणार आहे. “एक वादळ भारताचं’ या चळवळीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगण व आंध्रप्रदेश या राज्यातील ३५० पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती या अभियानाचे मुख्य समन्वयक वैभव शिंदे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

शालेय विद्यार्थी व नोकरदार यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र गृहिणी, ज्येष्ठ नागरिक व इतरांना यापासून वंचित रहावे लागते. हेच ओळखून ही चळवळ सुरु करण्यात आली. दरवर्षी सार्वजनिकरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. मात्र गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोना नियमांचे पालन करीत नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, आपापल्या घरी अंगणात, घराच्या छतावर, सोसायटीत, गल्ली वस्तीत ध्वजारोहण करुन राष्ट्रगीताचे गायन करावे असे आवाहन एक वादळ भारतातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी राष्ट्रगीताचे गायन होणार आहे.

महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील सौंसर, भोपाळ, इंदूर, जबलपूर, छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, भिलाई, गुजरातमधील सुरत, अहमदाबाद तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा व तेलंगणातील हैदराबाद येथे सामूहिक राष्ट्रगीताचा सोहळा पार पडेल.

या ठिकाणी करता येईल नोंदणी

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधून या सोहळ्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. प्रभातफेरीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करणे. सकाळी १०:३० वाजता ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायन असे या कार्यक्रमाची रुपरेखा असेल. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची देशभरातून नोंदणी होत असून त्यांच्याकडून गुगल फार्म भरून घेण्यात येत आहेत. इच्छुकांना www.ekvadalbharatach.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.