काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींची हत्या म्हणण्याऐवजी ‘वध’ असा शब्दप्रयोग केला. ते सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य करीत आहेत. हे लक्षात घेता त्यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांना मनोरुग्णालयात पाठवा, अशी मागणी करणारे पत्र भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिले आहे.
पटोलेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजातील सर्व क्षेत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे बावनकुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफीदेखील मागितलेली नाही. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्षाची ही विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे. पटोले अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करीत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून केली आहे.