दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि नियोजित वेळेत होणार आहेत, असे स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आदरांजली वाहण्यासाठी रविवारी त्या आल्या होत्या, तेव्हा त्या माध्यमांशी बोलत होत्या.
राज्य सरकार आणि शिक्षण विभाग कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च, तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत, तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार आहेत. त्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल का आणि या परीक्षा कशा पद्धतीने होणार, असा प्रश्न पालकांच्या मनात पडला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, असे वक्तव्य शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र कॅबिनेट मंत्री गायकवाड यांनी नियोजित वेळेतच परीक्षा होणार असल्याचे सांगितल्याने मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे.