Home मराठी विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका; रस्त्यावर उतरवणाऱ्यावर कडक कारवाई करा, नाना...

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका; रस्त्यावर उतरवणाऱ्यावर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

506

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल. परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरुन विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये. असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, त्या पूर्ववत सुरू कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करुनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी व पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरणे चुकीचे असून, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या परिक्षेच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी राज्य सरकारचा विरोध करत असून, आंदोलन देखील सुरू आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

नागपुर आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. ऑफलाईन परिक्षा न घेता ऑनलाईन परिक्षा घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी लाऊन धरली आहे. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस देखील फोडली आहे. विद्यार्थ्यांना भडवण्याचे काम कोण करत आहे. याचा शोध सध्या सुरू आहे.

ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज ठिकठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यात धारावीत पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुले अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढत आहेत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढत आहेत, भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश आहे. असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, संघटनांचे काय म्हणणे आहे त्याविषयी आमच्यासोबत चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.