Home मराठी लता मंगेशकर | कधीही शाळेत गेल्या नव्हत्या लता दीदी, खरे आडनाव आहे...

लता मंगेशकर | कधीही शाळेत गेल्या नव्हत्या लता दीदी, खरे आडनाव आहे हर्डीकर

599

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात त्यांचा झाला होता. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता या आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. 1945 साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीय मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली होती. घरची परिस्थिती हलाखीची होती. माई आणि आपली चार भावंडं यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी दीदींवर येऊन पडली. अशा कठीण काळात प्रसिद्ध नट-दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली.

मास्टर विनायक दीदींना मराठी सिनेमांत गाण्याची आणि अभिनयाची संधी दिली होती. वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल’ या 1942 सालच्या चित्रपटातले ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानत असे. लताजी यांनी पहिल्यांदाच 1942मध्ये मराठी सिनेमा ‘पहिली मंगळागौर’साठी गाणे गायले होते. लता यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी सर्वांनी संगीत क्षेत्राचीच निवड केली आहे.

Photo: Umesh Varma, Moonlight, Dharampeth, Nagpur.

लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे खूप मोठे प्रशंसक होते, म्हणून कदाचित ते लताजी यांच्या गायनाच्या विरोधात होते. 1942मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची अर्थिक स्थित ढासळली आणि लता यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली होती.

गेल्या सात दशकांत त्यांनी नऊशेहून अधिक हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली. याशिवाय इतर 37 प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या 25 हजारांपेक्षाही जास्त असावी. सात दशकांहून अधिकचा काळ लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने गाजवला.

‘आज तुम्ही रिजेक्ट केलं. मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडून तिला आपल्या सिनेमात गाणं गाण्याची विनंती करतील.’ ‘शहीद’ या सिनेमाचे दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप पातळ असल्याचे कारण देत त्यांना रिजेक्ट केले होते. तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी रागात येऊन ही भविष्यवाणी केली होती.

लता दीदींनी 1942 ते 1948 या काळात आठ सिनेमांमध्ये काम केले. ‘पहिली मंगळा गौर’ हा लता दीदींचा पहिला सिनेमा होता. तसे पाहता दीदी पाच वर्षांच्या असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या एका नाटकातसुद्धा अभिनय केला होता.

कवी प्रदीप यांनी लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल `ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता दीदींनी गायलेले गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नव्हते.

उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून लता दीदींनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. इथेच त्यांचा हिंदी चित्रपटात प्रवेश झाला.

1999 साली लता दीदींची निवड राज्यसभेवर झाली होती. त्या अनेकदा संसदीय कामकाजात सहभागी झाल्या होत्या. यासाठी त्यांनी कधीही वेतन, भत्ता किंवा खासदारांना मिळणारे घर घेतले नाही.

लता दीदींना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर नवीन कलावंतांना संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्मी कॅटेगरी अवॉर्ड घेण्यास नकार दिला होता.

लता दीदी केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर दीदींनी आपल्या वर्गातील मुलांना गाणे शिकवणे सुरु केले होते. शिक्षकांनी त्यांना रागावल्यानंतर दीदी नाराज झाल्या आणि त्यानंतर त्या कधीच शाळेत गेल्या नाही.