देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल महिनाभरानंतर एक लाखाच्या खाली गेली आहे. रविवारी संसर्गाचे 83 हजार 876 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान १ लाख ९९ हजार ५४ रुग्ण बरे झाले असून ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 जानेवारी 2022 रोजी 90,228 प्रकरणे समोर आली होती. 4 जानेवारी रोजी 58,097 नवीन रुग्ण आढळले होते.
शनिवारी 1 लाख 07 हजार 474 नवीन कोरोना संसर्गाची नोंद झाली असून 865 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 24,000 ची घट झाली आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय रुग्णांची म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11.08 लाखांवर आली आहे. देशात महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4.22 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत.
दुसरीकडे, कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत देशाला आता 9वी लस मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) ने सिंगल-डोस स्पुतनिक लाइट कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. देशात मंजूर झालेली ही 9वी कोरोना लस आहे. यामुळे देशाचा साथीच्या रोगाविरुद्धचा लढा बळकट होईल.