कोरोनाचं संकट काही थैमान घालायचं थांबलेलं नाही. पुन्हा एकदा चीनमधील एका शहरात पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास 4 मिलियन लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोनाच्या सुपर स्प्रेडर वेरीएंटनम धुमाकूळ घातल्यानं पुन्हा एकदा लाखो लोकं घरात कैद झाली आहेत. बीजिंच विंटर ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेखातर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, चीनमधील प्रशासनानंही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. तीन दिवसांत 70 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळले असल्याचं अमर उजालानं दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय. त्यामुळे जगातल्या बलाढ्य अर्थव्यवस्थेपैकी एक असूनही चीननं कोविडबाबत कडक पावलं उचलण्यात कोणतीही कसूर न केल्याचाही सूर ऐकायला मिळतोय. दरम्यान, आता लॉकडाऊनमुळे चीनमधील लोकांचे मात्र पुन्हा एकदा हाल सुरु होण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.
बैस व्हिएतनाम बॉर्डरपासून 100 किलोमीटर दूर वसलेलं शहर आहे. शुक्रवारी या ठिकाणी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. नव्या वर्षांची सुट्टी एन्जॉय करुन परतलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर रुग्णवाढीचा भडका पाहायला मिळाला. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीनं प्रशासनानं पावलं उचलत लॉकडाऊन घोषित केलाय. गुआंगशीतील बैस शहरात आता लॉकडाऊनमुळे कुणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे लोकांना घरातच कैद करण्यात आलं आहे. इतकंच काय तर गाड्यांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता प्रशासनाकडून मास टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे.