नागपूर ब्युरो : अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी रॅप गायक यो यो हनीसिंगला सत्र न्यायालयाने दणका दिलाय. हनीसिंगने आपल्या आवाजाचे नमुने देण्यासाठी आज नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्यात हजर व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिलाय. यापूर्वी 27 जानेवारी रोजी न्यायालयाने आवाजाचे नमुने देण्याकरिता 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला होता.
पण हनीसिंगने त्या आदेशाचं पालन केलं नाही. शिवाय त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून या आदेशात बदल करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावत आज पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे आज यो यो हनीसिंगला पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हनी सिंगने यूट्यूबवर अत्यंत अश्लील गाणे अपलोड केलीत. अशी तक्रार आनंदपाल सिंग गुरमान सिंग जब्बल यांनी २०१५ साली पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली. पाचपावली पोलिसांनी इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलमान्वये हनीसिंग विरोधात गुन्हा दाखल केलाय. देश सोडून कुठेही जाऊ नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. विदेशात प्रवास करायचा असेल, तर त्याला न्यायालयाची परवानगी लागते. 25 जानेवारीला पोलीस ठाण्यात हजर राहायचे होते.
पण, हनी सिंग गैरहजर राहिला. त्यासाठी त्याने गैरहजर राहण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतरच्या तारखांनाही तो गैरहजर राहिला. त्यामुळं न्यायालयाने हे आदेश दिलेत. यो यो हनीसिंगला नागपूर सत्र न्यायालयाने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिलेत. हनीसिंगने अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी पाचपावली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.