शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. त्या पत्रात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना मारण्याचा बदला घेण्यात येणार असे म्हटले आहे. सुत्रांकडून माहितीनुसार आज या धमकीचे पत्र देण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबतच्या चकमकीत 25 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यात एका कमांडरचाही समावेश होता.
एकनाथ शिंदे हे ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी पालकमंत्री आहेत. धमकी देणाऱ्याने शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक पत्र पाठवले. त्यात नक्षलवाद्यांना मारण्याचा बदला घेण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांना बदला घेण्याचे पत्र प्राप्त होताच, ठाणे पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी शनिवारी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले होते की, यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या आपल्याला मिळालेल्या आहेत. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या समस्येचा निपटारा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे. असे शिंदे यांनी सांगितले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरदरम्यान त्यांना असेच धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्याप्रकरणी वागळे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा मंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात आपण 25 नक्षलवादाच्या बदला घेणार असल्याचे म्हटले आहे.