Home मराठी बजाज समूहाचे 50 वर्षे अध्यक्ष; 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

बजाज समूहाचे 50 वर्षे अध्यक्ष; 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

489

बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रांट म्हणाले की, गेल्या एक महिन्यापासून ते रुग्णालयात होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि हृदयाचा त्रासही होता. राहुल बजाज यांनी दुपारी 2.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते. राहुल बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी पुण्यातील नानापेठ परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासून कौटुंबिक मैत्री सुरू होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.

राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. 2005 मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.