Home मराठी #Maha_Metro | महा मेट्रो नागपूरचा सातवा स्थापना दिन आज, परिपूर्ण ७ वर्षांच्या...

#Maha_Metro | महा मेट्रो नागपूरचा सातवा स्थापना दिन आज, परिपूर्ण ७ वर्षांच्या यशाचे श्रेय नागपूरकरांना

513

नागपूर ब्युरो : २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व २०१५ पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. २०१५ ते २०२२ या सात वर्षाचा प्रवास महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले, या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दोन मार्गिका ऑरेंज आणि अँक्वा लाईन या मार्गिका, शिवाय वर्धा रोडवरील डबल डेकर पूल, मनीष नगरचे आरओबी-आरयूबी सारखे अनेक प्रकल्प सुरु झाले. वर्धा रोड आणि हिंगणा मार्गांवरील सर्व स्थानकं प्रवाश्यांच्या सेवेत रुजू करण्यात आले. पंडमिकच्या अत्यंत कठीण काळातही मेट्रोच्या कार्याची गती कायम राखत बांधकाम पूर्ण करण्याचा आणि त्याचा दर्जा राखण्याचाही प्रयत्न महा मेट्रो नागपूरद्वारे करण्यात आला. महा मेट्रो नागपूर मेट्रोच्या निर्मितीशिवाय पुणे मेट्रोची निर्मिती, नाशिक निओची निर्मिती, नवी मुंबई मेट्रोचे संचलन, वारंगल मेट्रोचा डीपीआर तयार करण्याचे कार्य देखील करीत आहे.

लवकरच सेंट्रल एव्हेन्यू,(रिच -४) आणि कामठी मार्गावर (रिच – २) प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून कस्तुरचंद पार्क-सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी ते लोकमान्य नगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत नवीन कीर्तिमान स्थापित करीत आहे. नागपूर मेट्रोच्या कार्याचा गौरव इतर राज्यातील शहरांमध्ये देखील होत आहे. नुकतेच महा मेट्रोने तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब व ८०० टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली आहे.

एकेक पायरी चढत हा मोठा डोंगर सर करतांना लागणारे नागरिकांचे सहकार्य वेळोवेळी मिळत राहिले आणि म्हणून यशाचे कीर्तिमान रचणे शक्य झाले. या सगळ्या यशाचे श्रेय महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित ह्यांनी नागपूरच्या नागरिकांना दिले आहे. यापुढीलही उर्वरित कार्य जलदगतीने व कार्याचा दर्जा कायम राखत पूर्ण केले जाईल अशी हमीही त्यांनाही दिली आहे