Home Nagpur #Maha_Metro | मुख्य मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त आणि पथकाचे ३ दिवसीय रिच-४...

#Maha_Metro | मुख्य मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त आणि पथकाचे ३ दिवसीय रिच-४ चे निरीक्षण संपन्न

862

सीएमआरएस अधिकाऱ्यांनी मेट्रो कार्याबद्दल व्यक्त केले समाधान

नागपूर ब्युरो : महा मेट्रो नागपूरच्या रिच-४ अंतर्गत असलेल्या सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन अंतर्गत असलेल्या विविध कार्यांचा मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) श्री जनक कुमार गर्ग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी गेले ३ दिवस सलग पाहणी केली. मेट्रोच्या संपूर्ण कार्याबद्दल आज पाहणीच्या शेवटच्या दिवशी श्री गर्ग यांनी समाधान व्यक्त केले. १८ फेब्रुवारी (शुक्रवार) पासून तीन दिवस या पथकाने मेट्रोच्या या मार्गिकेवरील एकूणच प्रकल्पाची पाहणी केली. ही पाहणी अधिकाऱ्यांनी मेट्रो ट्रेन आणि ट्रॉलीच्या माध्यमाने केली.

या दौऱ्या दरम्यान या सर्व अधिकाऱ्यांनी रोलिंग स्टॉक ची चाचणी तसेच पाहणीचा भाग म्हणून ८० किलोमीट प्रति तास वेगाने धावणाऱ्या मेट्रो गाडीने अधिकाऱ्यांनी प्रवास केला. सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मार्गिकेची एकूण लांबी ८.३ किलोमीटर आहे. सीएमआरएस पथकाने विविध मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांकरता आवश्यक असलेल्या उद्घोषणा, एएफसी गेट, अलार्म सारख्या विविध सोयी-सुविधांचाआढावा देखील घेतला.

अप आणि डाऊन मार्गिकांवर क्रॉसिंग संबंधी विविध तांत्रिक बाबींचे निरीक्षण या चमूने केले. या शिवाय लिफ्ट, एस्केलेटर आणि वरिष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाश्यांकरता असलेल्या सोईंचा आढावा देखील त्यांनी घेतला. सीएमआरएस पथकाने रोलिंग स्टॉक, ओएचई, ट्रॅक संबंधी तांत्रिक बाबींसंबंधी माहिती घेत त्या बद्दल महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.

या सोबतच आनंद टॉकीज जवळील २३१.२ मीटर लांब बैलेंस्ड कैंटिलीवर ब्रिजचे देखील निरीक्षण केले. मॅन लिफ्टरच्या माध्यमाने येथील ९७ मीटर लांब स्पॅन आणि संबंधित विविध तांत्रिक बारकाव्यांची विस्तृत माहिती घेत रामझुला येथील मेट्रो क्रॉस ओव्हरची पाहणी देखील या दरम्यान केली. या पथकाने सिताबर्डी इंटरचेंज येथून सुरु करत रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्स्चेंज, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशन वरील एकूणच असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास केला. या निरीक्षणात मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री गर्ग यांच्या सोबत श्री ऋषभ द्विवेदी आणि श्री चंदन कुमार हे दोन अधिकारी देखील उपस्थित होते.

महा मेट्रो तर्फे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टिम) श्री सुनील माथूर, कार्यकारी संचालक (ऑपरेशन अँड मॅनेजमेंट) श्री उदय बोरवणकर, कार्यकारी संचालक (रिच ३ आणि ४) श्री अरुण कुमार, कार्यकारी संचालक (डिझाईन) श्री रामनवास, कार्यकारी संचालक (लिफ्ट अँड एस्केलेटर) श्री राजेश पाटील, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) श्री सिन्हा, महा व्यवस्थापक (ऑपरेशन अँड मॅनेजमेंट) श्री सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प अधिकारी श्री घटुवारी, प्रकल्प संचालक (जनरल कंसल्टंट), श्री रामनाथन, सह महा व्यवस्थापक श्री नरेंद्र उपाध्याय आणि महा मेट्रो नागपूरचे इतर अधिकारी या निरीक्षणा दरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते.