Home कोरोना लहान मुलांचे लसीकरण अधिक वेगाने होणार; ‘या’ लसीच्या आपातकालीन वापरास मिळाली मंजुरी

लहान मुलांचे लसीकरण अधिक वेगाने होणार; ‘या’ लसीच्या आपातकालीन वापरास मिळाली मंजुरी

500

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात भारताला आणखी एक नवीन शस्त्र मिळाले आहे. लहान मुलांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘बायोलॉजिकल ई कोर्बेवॅक्स’ या लसीला अखेर मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता लहान मुलांचे लसीकरण वेगाने होण्यास मदत होणार आहे. ‘कोर्बेवॅक्स’ ही लस 12 ते 18 या वयोगटातील मुलांनी दिली जाणार आहे.

14 फेब्रुवारीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बायोलॉजिकल ईची ‘कोर्बेवॅक्स’ या कोरोना लसीला आपातकालीन वापरास परवानगी देण्याचे भाष्य केले होते. निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी सांगितले होते की, लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि त्यासाठी अधिक लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी नियमितपणे आढावा घेतला जातो. DCGI ने यापूर्वी 28 डिसेंबर रोजी ‘कॉर्बेवॅक्स’ला मर्यादित आधारावर आपातकालीन वापरास मान्यता दिली होती. कोरोनाविरुद्ध भारतात विकसित केलेली ही आरबीडी आधारित लस आहे.

कॉर्बेवॅक्स ही लस तयार करणारी कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडने सांगितले आहे की, 12 ते 18 या वयोगटातील मुलांच्या आपातकालीन वापरास ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजूरी दिली आहे. यापूर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आधीच प्रौढांसाठी कॉर्बेवॅक्सला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. कॉर्बेवॅक्स ही कोरोना विरूद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे.

कंपनीचे गुणवत्ता आणि नियामक प्रकरणांचे प्रमुख श्रीनिवास कोसाराजू म्हणाले की, कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कॉर्बेवॅक्सच्या फेज II-III क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी मिळाली होती. कॉर्बेवॅक्स लस स्नायूंद्वारे शरीरात दिली जाईल. 28 दिवसांत दोन डोसमध्ये ही लस घ्यावी लागणार आहे.

गेल्या आठवड्यातच, केंद्रीय औषध नियामक विषय तज्ञ समितीने (SEC) बायोलॉजिकल-ई कोरोना लस कॉर्बेवॅक्सला काही अटींसह 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर अखेर डीसीजीआयने वापरास परवानगी दिली आहे.