Home Maharashtra 14 जिल्हे अनलॉक, मराठवाड्यात निर्बंध कायम; नाट्यगृहे, थिएटर्स, रेस्तराँ पूर्ण क्षमतेने होणार...

14 जिल्हे अनलॉक, मराठवाड्यात निर्बंध कायम; नाट्यगृहे, थिएटर्स, रेस्तराँ पूर्ण क्षमतेने होणार सुरू

राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नियमांमधून बुधवारी (२ मार्च) अनेक शिथिलता देण्यात आल्या आहेत. नवे नियम ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. विशेष म्हणजे निर्बंधमुक्त जिल्ह्यांच्या यादीत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील एकाही जिल्ह्याचा समावेश नसल्याने त्या ठिकाणी पूर्वीचेच निर्बंध कायम राहणार आहेत.

मागच्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होते आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात नवी नियमावली बुधवारी जारी केली आहे. १४ जिल्हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निकष तयार केले आहेत. त्या निकषांना ग्रुप ए असे नाव दिले आहे. ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले ९० टक्के नागरिक, दुसरा डोस घेतलेले किमान ७० टक्के नागरिक, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून कमी, रूग्णाला लागणारे बेड आणि ऑक्सिजन सपोर्ट बेड यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून कमी असे चार निकष ज्या जिल्ह्यांना लागू पडतात त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या जिल्ह्यांना ए ग्रुप मधले जिल्हे असे संबोधण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले चौदा जिल्हे आहेत जिथे सर्व क्षमतेने थिएटर्स, चित्रपटगृहं आणि रेस्तराँ सुरू होणार आहेत.

निर्बंधमुक्त जिल्हे पुढीलप्रमाणे
मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर.