Home Exam आजपासून बारावीची परीक्षा । 2 वर्षांनी ऑफलाइन परीक्षा 14 लाख 85 हजार...

आजपासून बारावीची परीक्षा । 2 वर्षांनी ऑफलाइन परीक्षा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांची नोंदणी

कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यभरात शुक्रवारपासून इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. ऑफलाइन स्वरूपात होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ८२२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांनी कुठल्याही दडपणाशिवाय मोकळेपणाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही गोसावी यांनी केले.

शाळा तेथे परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. सर्व विभागीय मंडळांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षाकाळात कोरोनाबाधित झाल्यास वा अन्य वैद्यकीय अपरिहार्यतेमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत परीक्षा देण्याची सोय केली आहे. लेखी परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल. अधिक वेळ देण्यात येणार आहे. १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. -शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य बोर्ड

राज्यभरात बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून विद्यार्थिसंख्या ८ लाख १७ हजार ६११ आहे. विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ६८ हजार ८८ आहे. राज्यातील एकूण १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांतून विद्यार्थी प्रविष्ट आहेत.