पुणे ब्युरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. या दौऱ्यात त्यांना पुणे महापालिकेकडून विशेष फेटा घालण्यात येणार आहे. या हिरेजडीत फेट्याची पुर्वीपासूनच जोरदार चर्चा आहे. मात्र, या फेट्यावर राजमुद्रेचा वापर केल्याने काँग्रेसने मोदींना हा फेटा देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे दौऱ्यातच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे खबरदारी घेत या फेट्यावरील राजमुद्राच आता काढण्यात आली आहे.
मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून हा फेटा तयार करण्यात आला आहे. एमआयटी येथील कार्यक्रमात पुणे पालिकेकडून त्यांना हा फेटा घालण्यात येणार होता. परंतु फेट्यावरील राजमुद्रेला काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिचा अशा पद्धतीने वापर करत मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा हा प्रकार आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्राच आता काढून टाकण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आपल्या विरोधाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘भाजपतर्फे सातत्याने महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. मोदींना देण्यात येणाऱ्या फेट्यावर शिवरायांजी राजमुद्रा वापरणे, हा त्याचाच पुढील प्रकार आहे. शिवरायांची राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा अशा पद्धतीने मोदींना देण्यात येणाऱ्या फेट्यावर वापर करणे म्हणजे मोदींना शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रकार आहे.’ त्यामुळे पुणे महापालिकेने मोदींना असा फेटू देऊ नसे, असे आवाहनही मोहन जोशी यांनी केले होते.
राज्यपाल भगसतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून द्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका केली होती.