Home Crime Nagpur । संतापाच्या भरात पत्नी, मुलीचा गळा चिरून पतीची आत्महत्या, मुलाला जिवंत...

Nagpur । संतापाच्या भरात पत्नी, मुलीचा गळा चिरून पतीची आत्महत्या, मुलाला जिवंत सोडले

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजीवनगर येथे राहणाऱ्या तरुणाने आधी पत्नी व मुलीची हत्या करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजीवनगरातील सरोदी मोहल्ला येथे राहणारा विलास संपत गवते (४२), त्याची पत्नी रंजना गवते (३५) व मुलगी अमृता गवते (१२) अशी मृतांची नावे आहेत. विलासने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने आधी तोंड दाबून पत्नी व मुलीचा गळा चिरला. नंतर स्वत: गळफास घेतला घेतला. सर्व जण झोपल्यानंतर त्याने मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हे कृत्य केले. मुलावर जीव असल्याने त्याने मुलाला मारले नाही, अशी शक्यता पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी व्यक्त केली.

 

सकाळी विलासचा लहान मुलगा (८) बाथरूमला जाण्यासाठी उठल्यावर हे दृश्य पाहून घाबरला. त्याने याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. विलास गवते याला दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले होती. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचे सांगितले. विलास गवते तापट स्वभावाचा होता. तो ज्या ठिकाणी राहत होता तिथेही त्याचे कुणाशीच पटत नव्हते. ताे कायम चिडचिड करत असे. तो काहीही कामधंदा करीत नव्हता. त्याची पत्नी व दीर दुधाचा व्यवसाय करत होते. भाऊ आईवडिलांसह शेजारीच राहतो.

विलासच्या स्वभावात फरक पडावा यासाठी अनेकदा त्याला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथून तो पळून येत असे. घरच्यांना तो नेहमी मारून टाकण्याची धमकी देत असे. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.