कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे आता पीएफ खातेधारकांना जमा रकमेवर 8.5 टक्क्यांऐवजी 8.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. ईपीएफ किंवा पीएफ साठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला काही पैसे कपात केले जातात. हे पैसे त्यांना निवृत्ती नंतर उपयोगी पडतील हा यामागचा उद्देश आहे. वास्तविक पीएफ खातेधारकांना या व्यतिरिक्त अनेक फायदे मिळतात, याची अनेकांना माहिती नाही. हे खालील माहितीतून तुमच्या लक्षात येईल.
इतर सरकारी योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर
पीएफओच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरात कपात करण्यात आली असली, तरी देखील यावर मिळणारे व्याजदर इतर सरकारी योजना जसे, पीपीएफ किंवा एफडी यापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत पीएफ मध्ये तुमचा जो पैसे जमा होतो त्यावर तुम्हाला जास्त व्याज मिळते.
दिला जातो सहा लाखाचा मोफत विमा
पीएफ खाते सुरू होताच तुम्हाचा विमा काढला जातो. ‘एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स’ योजनेअंतर्गत पीएफ खात्यावर सहा लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. नैसर्गिक कारणाने, आजाराने किंवा दुर्घटनेमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या वारसाला एकरकमी पैसा मिळतो. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, हा यामागचा उद्देश आहे. हा फायदा कंपनी आणि केंद्र सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिला जातो.
करात मिळते बचत
करामध्ये बचत करण्यासाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी पीएफ हा ही एक पर्याय आहे. नवीन कर प्रणाली मध्ये याचा फायदा मिळत नसला तरी जुन्या कर प्रणालीनुसार पगाराच्या 12% योगदानापर्यंत तुम्हाला करात सूट मिळू शकते. या बचतीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत करात सूट दिली जाते.
निवृत्तीनंतर पेन्शन सुद्धा लागू
ईपीएफ कायद्यानुसार कर्मचाऱ्याचा बेसिक पगार प्लस डीए 12 टक्के पीएफ खात्यात जमा होत असतात. तसेच कंपनीदेखील कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि त्याचे 12 टक्के योगदान देते. कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 3.67 टक्के कर्मचाऱ्यांचा पीएफ खात्यात जातात. उर्वरित 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन योजनेत जमा केली जाते.
पैसे काढण्याची सुविधा
महामारी आणि बेरोजगारी याचा विचार करुन निवृत्तीपूर्वी पीएफ खात्यातून काही पैसे काढण्याची सुविधा सरकारने दिली आहे. म्हणजेच तुम्ही आवश्यकतेनुसार तुमच्या खात्यातून पैसे काढून त्याचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कर्मचारी 5 वर्ष एका कंपनीमध्ये सेवा देत असेल आणि त्याचा पीएफ तो काढत असेल तर त्यावर प्राप्तिकर भरावा लागणार नाही. जर पाच वर्षे पूर्ण झाले नसतील तर 10 टक्के टीडीएस आणि कर भरावा लागेल.
बंद खात्यावरही व्याज मिळते
पीएफ धारकांच्या बंद पडलेला खात्यावर देखील व्याज मिळते. म्हणजे जर तुमचे पीएफ खाते तीन वर्षा पेक्षा अधिक काळासाठी बंद असेल, तरी तुम्हाला व्याज मिळेल. हा बदल 2016 मध्ये ईपीएफओच्या वतीने करण्यात आला आहे. या आधी तीन वर्षापर्यंत खाते बंद राहिल्यास पीएफ वर व्याज देण्यात येत नव्हते.