Home मराठी औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासोबत असणार नाहीत

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासोबत असणार नाहीत

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे, आमच्यासोबत असणार नाही, भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही असे मत राऊतांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे एमआयएमने युतीसाठी महाविकास आघाडीसमोर हात पुढे केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. भाजप आणि एमआयएमची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत, असे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. एमआयएमला जर उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करायचा होता, तर त्यांनी काळजीपूर्वक पावले टाकायला हवी होती. जे आधीच भाजपबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत, ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय म्हणाले जलील ?

एमआयएमवर नेहमी आरोप होत असतो की ते भाजपची बी टीम आहेत. असेच वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. यावर जलील यांनी राजेश टोपेंना आघाडी करण्याची ऑफर दिली आहे. एमआयएम जर बी टीम वाटू द्यायची नसेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? असा सवालच जलील यांनी यावेळी टोपेंना केला आहे. तर आता बघायचे आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.