गेली अडीच वर्षे राज्यात माहाविकास आघाडीचे सरकार आहे. जर भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आमच्यासोबत युती करावी. अशी ऑफर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आता राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का अशी चर्चा सुरू ढाली आहे. राज्यात एमआयएमचा एक खासदार, 2 आमदार आणि 29 नगरसेवक अशी ताकद आहे. यामुळे आता एमआयएमकडून आलेली ऑफर काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वीकारणार का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असा नारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला होता. यावर शरद पवारांनी देखील अशीच भूमिका मांडली होती. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. एमआयएमवर नेहमी आरोप होतो की त्यांच्यामुळे भाजप निवडणूक जिंकते. हम मत बदलायचे असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? असा सवाल जलील यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर काही प्रतिसाद न दिल्याने, आता बघायचे आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना काँग्रेसला देखील युती करण्याचे आव्हान दिले आहे. इतर पक्षांना फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत, आम्ही कुणालाही नको आहोत. असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष कशाला मानतात ?. त्यांनाही मुस्लीम मते हवी आहेत. तर मग यावे आपण युती करु, अशी ऑफर जलील यांनी दिली आहे.
देशाचे सर्वांत जास्त नुकसान कुणी केले असेल तर ते भाजपने केले आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावे लागणार ते आम्ही करायला तयार आहोत. उत्तर प्रदेशातही आम्ही बसपा आणि सपासोबत बोलणी केली होती. मात्र त्यांना मत हवे आहेत पण आमची साथ नको म्हणून आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिली आहे, अशा शब्दांत जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे.