इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला शनिवारी बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील परीक्षा केंद्राजवळ २ प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स काढून विक्री करण्याचा प्रकार समोर आला. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकून हा भांडाफोड केला. झेरॉक्स सेंटर चालकाला ताब्यात घेतले आहे.
इयत्ता दहावी परीक्षेला १५ मार्चपासून सुरुवात झाली. १९ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. दरम्यान, साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना संजय मुरलीधर पालवे (रा. उक्कडपिंप्री, ता. गेवराई) याच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केल्या जात असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यांनी हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे व सचिन अहंकारे यांना रवाना केले. या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यावेळी प्रश्न क्र. ३ व ४ च्या झेरॉक्स प्रती २० रुपयांना एक याप्रमाणे विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. २ प्रश्नांच्या प्रत्येकी ८० प्रती मिळून एकूण १६० प्रती जप्त केल्या. झेरॉक्स यंत्रही ताब्यात घेतले.
प्रश्नपत्रिकेत २ गुणांची चूक, काहींना प्रश्न कळला नाही : इंग्रजी प्रश्नपत्रिकेत दोन गुणांच्या प्रश्नांत चूक झाल्याचे निदर्शनास आले. प्रश्न क्रमांक दोन मधील ए थ्री, मॅच द डीसक्राईबिंग वर्ड्स प्रश्नामध्ये नाम व विशेषण यांच्या योग्य जोड्या लावण्यासाठी विचारण्यात आल्या. परंतु याठिकाणी नामाच्या रकान्यात विशेषणे व विशेषणाच्या रकान्यात नाम देण्यात आलेली आहेत. नाम आणि विशेषणाची अदलाबदल झाल्याने हा प्रश्न सोडवताना विद्यार्थी बुचकळ्यात पडले, तर विद्यार्थ्यांना हा प्रश्नच कळाला नाही.