Home मराठी राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब शिवरायांना अभिवादन

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात शिवरायांना वंदन केले जात आहे. मुंबईतदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबई विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करत शिवरायांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.

दादरमधील शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवजयंती साजरी केली जात आहे. यासाठी मनसेने जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्क परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मनसैनिक सकाळपासूनच येथे मोठ्या संख्येने उपस्थित असून ढोल-ताशांच्या निनादाने व शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला आहे. आज शिवाजी पार्कमध्ये मनसेतर्फे अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी 7 वाजताच जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिरात अभिषेक करत त्यांनी पुजा केली. त्यानंतर शिवजन्मस्थानाचे दर्शन घेतले.