Home बॉलिवूड #Nagpur | ‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांची ‘ऐसी भी दिवानगी’ 

#Nagpur | ‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांची ‘ऐसी भी दिवानगी’ 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिसरा दिवस

नागपूर ब्यूरो: पुरूषाच्‍या कंठातून स्‍त्रीचा आवाज हुबेहुब काढण्‍याची कसब नव्‍हे देणगी लाभलेल्‍या ‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांनी दोन्‍ही आवाजात गाणी सादर करून रसिकांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. लता मंगेशकर, आशा भोसले, अल्‍का याज्ञिक या लोकप्रिय गायिकांच्‍या आवाजाना पूर्णपणे न्याय देत नागपूरकरांचे चांगलेच मनोरंजन केले.

केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतील खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या तिस-या दिवशी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये ‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट पार पडली. ‘जगातले आठवे आश्‍चर्य’ म्‍हणून ज्‍यांचा उल्‍लेख केला जातो ते साईराम अय्यर हे स्‍त्री आणि पुरूष अशा दोन्‍ही आवाजात किती लिलया गातात, याचे प्रात्‍यक्षिक उपस्‍थतांनी अनुभवले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

आंतरविद्यापीठांच्‍या स्‍पर्धांवेळी अनेकदा नागपूरला याआधी येऊन गेलेल्‍या साईराम अय्यर यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्‍हणाले, येथे स्‍पर्धामध्‍ये अनेक पारितोषिके पटकावली व नंतर परीक्षक म्‍हणून नागपुरात आलेलो आहे. त्‍यामुळे आज येथे आल्‍यानंतर आपल्‍याच घरी आल्‍यासारखे वाटते आहे. लता मंगेशकर यांना एकलव्‍यासारखे आपला गुरू मानणा-या साईराम अय्यर लतादीदीच्‍या प्रतिमेसमोर नतमस्‍तक झाले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

साईराम अय्यर यांनी देश-विदेशात अनेक कार्यक्रम केले. त्‍यांच्‍या कंठातून स्‍त्रीचा आवाज कसा निघतो यांचे अनेकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे. त्‍याचे प्रात्‍यक्षिक त्‍यांनी सत्‍यम् शिवम् सुंदरम या गीताच्‍या माध्‍यमातून सादर केले. दिवाना हुआ बादल हे युगल गीत स्‍त्री व पुरूष अशा दोन्‍ही आवाजात त्‍यांनी सादर करून रसिकाच्‍या टाळ्या घेतल्‍या. आओ हुजूर तुमको हे आशा भोसले यांचे गीत त्‍यांनी त्‍याच नजाकतीने सादर केले तर ऐसी दिवानगी हे अल्‍का याज्ञिक यांचे गीत त्‍यांच्‍याच आवाजात सादर करून लोकांना तोंडात बोटे घालायला लावली. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्‍या आवाजातले ये राते ये मौसम हे गीतही त्‍यांनी सादर केले. सख्‍या रे, सुन्‍या सुन्‍या मैफ‍िलीत माझ्या, मी डोलकर, नभ उतरू आले अशी मराठी गाणीही सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. मनिषा जांभोटकर, सर्वश मिश्रा, उल्‍का यांनीही त्‍यांच्‍यासोबत अनेक गीते सादर केली. आरजे अमीत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

तिस-या दिवसाच्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने झाले. हॉटेल अशोकाचे संजय गुप्‍ता, एम्‍सच्‍या प्रमुख विभा दत्‍ता, गायक सुनील वाघमारे व सागर मधुमटके यांची उपस्‍थ‍िती होती. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.

……………

आज महोत्‍सवात

‘व्‍हर्सटाईल’ जावेद अली यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट

………