प्राप्तिकर विभागाने देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्प आणि तिचे अध्यक्ष पवन मुंजाल व इतरांच्या अनेक परिसरांवर छापे टाकले. करचोरीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागाची पथके गुरुग्राम, दिल्लीसहित इतर शहरांतील कंपनीच्या कार्यालयांची तसेच निवासी परिसरांची तपासणी करत आहेत.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांच्या आर्थिक कागदपत्रांची आणि इतर व्यावसायिक देवाणघेवाणीची चौकशी सुरू केली आहे. हीरो मोटोकॉर्पने म्हटले की,‘ ही नियमित तपासणी आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. हीरो मोटोकॉर्प हा नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन करणारा कॉर्पोरेट समूह आहे. कंपनी कॉर्पोरेट प्रशासनाच्या सर्वोच्च मापदंडांचे पालन करते. आम्ही चौकशीत सहकार्य करत आहोत आणि आमचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे सर्व हितधारकांना आश्वस्त करतो.’ सूत्रांनुसार, कंपनीच्या अध्यक्षांनी खात्यांत बनावट खर्च दाखवल्याचे आरोप आहेत. तथापि, प्राप्तिकर विभागाने अधिकृत माहिती दिली नाही.
कंपनीच्या शेअरमध्ये घसरण : छाप्यांच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बुधवारी १२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये १.८६% घसरण दिसली. त्याचे मूल्य २,३७८.५५ रुपये होते.
विक्रीबाबत हीरो मोटोकॉर्प २००१ मध्ये जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणारी कंपनी ठरली. २० वर्षांपासून हा दर्जा कायम आहे. कंपनीने आतापर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत १० कोटींपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. पवन मुंजाल यांच्या नेतृत्वात कंपनीने आशिया, आफ्रिका, दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ४० देशांत विस्तार केला आहे.