Home मराठी संपाच्या पहिल्या दिवशी राज्यात सर्व सेवा सुरळीत, कामगार संघटनांचा दावा, 8 राज्यांत...

संपाच्या पहिल्या दिवशी राज्यात सर्व सेवा सुरळीत, कामगार संघटनांचा दावा, 8 राज्यांत व्यवहार ठप्प

कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय देशव्यापी संपाला सोमवारी औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी फारसा परिणाम झाला नसल्याचे सीआयआयचे अध्यक्ष एन. श्रीराम आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी सांगितले. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत बहुतांश सेवा सामान्य पद्धतीने सुरू राहिल्या.राज्यात वाहतूक आणि वीजसेवा सुरळीत सुरू आहे. कंपन्यांत कामगारांची उपस्थिती नेहमीसारखी असल्याने उद्याेग सुरू आहेत.

दाशरथी म्हणाले, पहिल्या दिवशी संपाचा परिणाम झाला नाही. वीज, वाहतूक सुरू आहे. सर्व कंपन्या सुरू आहेत. एन. श्रीराम यांनी सांगितले की, कंपनीमध्ये कामगार कामावर हजर असल्याने सध्या काहीही अडचण नाही. लघुउद्याेगांवर थाेडासा परिणाम झाला असेल. सीआयआयचे मराठवाडा अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले, वीजपुरवठा सुरळीत असल्याने कंपन्यांवर परिणाम जाणवला नाही. जर ब्रेकडाऊन झाला तर कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कंपन्यांचे कामगार संपावर नसल्यामुळे औरंगाबाद आणि राज्यातही संपाचा फारसा परिणाम झाला नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या इशाऱ्यानंतरही वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. मात्र, त्याचा फार परिणाम जाणवला नाही.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूर यांनी जारी केलेल्या पत्रकात ५ हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याचा दावा केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी संपकरी दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कलमध्ये मानवी साखळी उभारणार असल्याचे तुळजापूर यांनी सांगितले. संपामुळे ग्राहकांच्या सेवेवर काहीसा परिणाम होईल, असे एसबीआयने म्हटले आहे. एटीएममधील रोकडवर किती परिणाम झाला याची तत्काळ माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

कामगार संघटनांच्या दोन दिवसांच्या संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पश्चिम बंगाल, केरळ व तामिळनाडू या राज्यांतील हजारो कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे या राज्यांतील बँकांच्या व्यवहारांवर परिणाम झाला. सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला. तथापि, आरोग्यसेवा, वीज आणि इंधन पुरवठा यांसारख्या आवश्यक सेवांवर कुठलाही परिणाम झाला नाही. संपाच्या पहिल्या दिवशी आठ राज्यांत बंदसारखी स्थिती होती, असा दावा संघटनांनी केला.