Home मराठी Nagpur । आरएसएस मुख्यालय, रिझर्व्ह बँकेच्या चित्रणास मज्जाव, रेकी प्रकरणानंतर सहपोलिस आयुक्तांचा...

Nagpur । आरएसएस मुख्यालय, रिझर्व्ह बँकेच्या चित्रणास मज्जाव, रेकी प्रकरणानंतर सहपोलिस आयुक्तांचा निर्णय​​​​​​​

नागपुरातील संघ मुख्यालय, रिझर्व्ह बँक आणि विमानतळ इमारतींचे छायाचित्रण आणि व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात सहपोलिस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. दहशतवाद्यांकडून नागपुरातील महत्त्वाच्या स्थळांची रेकी करण्याची बाब समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

जम्मू-काश्मिरातील दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलने जून २०२१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची व अन्य स्थळांची रेकी केली होती. स्लीपर सेलच्या या दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून डिसेंबर २०२१ मध्ये ही बाब पुढे आली. त्यानंतर यासंदर्भात नागपूर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे करत आहे.

आता या प्रकरणी पोलिसांनी संघ मुख्यालयासह विमानतळ, आरबीआय इमारतीची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी घेण्यास मनाई केली आहे. सोबतच असे केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनी आदेश काढले आहेत. बॉम्ब पेरणे, गोळीबार करणे, स्फोट घडवणे, आत्मघाती हल्ला करणे असे दहशतवादी हल्ले उधळून लावण्याची आमची तयारी आहे. नागपूर पोलिस सतर्क असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.