मुंबईतील बार, रेस्टाॅरंटकडून दरमहा १०० कोटी वसुली करण्याचे कारस्थान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेच होते. पोलिस बदल्यांमध्येही त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. बार, रेस्टॉरंट मालकांकडून तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझेने वसूल केलेले ४.७० कोटी देशमुख यांनी हवालामार्गे नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत वळवले, असा ठपका ईडीने ठेवला आहे.
देशमुख यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्यात यावा तसेच ईडीने दाखल केलेला खटला अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे अर्जात म्हटले आहे. यावर ईडीने आक्षेप घेतला असून ईडीच्या वतीने सहायक संचालक तासिन सुलतान यांनी शपथपत्र दाखल केले. त्यात देशमुख चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप करून देशमुख वजनदार आसामी असल्याने तपासावर परिणाम होऊ शकेल, असे या मुद्द्यावर ईडीने जामिनास विरोध दर्शवला. याप्रकरणी पोलिस दलातील बदल्यांमध्ये देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा गैरवापर केला. एक कॅबिनेट मंत्री आणि देशमुख हे आपल्या मर्जीप्रमाणे पोलिस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांची यादी तयार करीत. त्याची कुठेही अधिकृत नोंद ठेवली जात नव्हती. तीच अनधिकृत यादी तत्कालीन अतिरिक्त गृहसचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवली होती. बदल्यांची अनधिकृत यादी तयार केली जात होती याची कबुलीही देशमुख यांनी दिल्याचे ईडीच्या शपथपत्रामध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुलीच्या कटामध्ये देशमुख यांचा मुलगा हृषीकेश, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे सहभागी असून खुद्द अनिल देशमुख हेच यामागचे सूत्रधार आहेत. दरमहा १०० कोटी वसुली करण्यासाठी गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख हे वाझेला आपल्या शासकीय निवासस्थान ‘ज्ञानेश्वरी’ येथे वारंवार बोलावत. तसेच इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैशाच्या अवैध व्यवहारासाठी शासकीय निवासस्थानी बोलावत होते, असा दावा ईडीने केला आहे.
बारमालकांकडून वाझेने गोळा केलेले ४ कोटी ७० लाख रुपये देशमुख कुटुंबीयांच्या मालकीच्या नागपूर येथील साई शिक्षण संस्थेत हवालामार्गे वळवण्यात आले. सन २०११ पासून देणग्यांच्या नावाखाली या संस्थेमध्ये १३.२५ कोटींची बेहिशेबी रक्कम वळवण्यात आली. रोख रकमेच्या भागभांडवलामध्ये रूपांतर करून बोगस कंपन्यांमार्फत देशमुख यांनी प्रचंड मोठे उद्योग साम्राज्य उभे केले असा ठपका ईडीने ठेवला आहे.