कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक
पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोडवरच्या “सिल्व्हर ओक’ निवासस्थानी धडक दिली. आझाद मैदानावर आंदोलन करणारे संपकरी अचानक येथे धडकले आणि त्यांनी पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे चप्पलफेक, दगडफेक केली. यामुळे काही काळ तणाव पसरला. दरम्यान, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसही चक्रावले. याबाबत पोलिस तयारीत नसल्याने आंदोलक पवारांच्या निवासस्थानाबाहेर पाेहोचू शकले.
अॅड. सदावर्ते अटकेत : एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आंदोलक सिल्व्हर ओकवर आले तेव्हा सदावर्ते सोबत नव्हते.
ही माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये नरेंद्र राणे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, बबन कनावजे होते. एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणारेअॅड. गुणरत्न सदावर्ते भाजपचे दलाल असून त्यांना सोडणार नाही, असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी दिला.
१०५ आंदोलकांत ३४ महिला : आंदोलकांची संख्या सुमारे १०५ होती, त्यात ३४ महिला होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. एसटी संपकाळात आत्महत्या केलेल्या १२० एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा प्रश्न आंदोलक विचारत होते. महिला आंदोलकांनी या वेळी पवारांच्या निवासस्थानासमोर बांगड्या फोडल्या.
१०७ अटकेत : १०७ आंदोलकांवर रात्री गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये रात्री गुन्हे दाखल झाले असून सर्वांना अटक केली आहे. त्यामध्ये १०५ आंदोलक सिल्व्हर ओकवरचे असून दोन आंदोलक आझाद मैदानावरचे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते व वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना रात्री पोलिसांनी अटक केली.