Home कोरोना देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर’ डोस; देशात लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण

देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर’ डोस; देशात लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण

देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने केलेल्या घोषणेनुसार 10 एप्रिल म्हणजे आजपासून बुस्टर डोस नागरिकांना घेता येणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.

लस निर्माते सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने बुस्टर डोसच्या किमती कमी केल्या आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हींचा बूस्टर डोस 225 रुपयांचा होईल. लसीच्या किमतीवर 5 टक्के (11.25 रु.) जीएसटी द्यावा लागेल. रुग्णालये कमाल 150 रुपये सर्व्हिस चार्ज घेऊ शकतील. अशा प्रकारे एका बुस्टर डोसची कमाल किंमत 386.25 रुपयेच असेल. किमती कमी करण्याची घोषणा सर्व प्रौढांना प्रिकॉशन डोस लावण्याच्या निर्णयानंतर करण्यात आली. तथापि, 10 एप्रिलपासून 18 वर्षे आणि त्यावरील सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयांत कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली.

गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.