राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंडे यांना हृदयविकार झाल्याचे कळताच नेतेमंडळींनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील ब्रीच कँडी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
आता काळजीचे कारण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
धनंजय मुंडे काल परभणी दौऱ्यावर होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.