18 एप्रिल ते 15 ऑगस्ट पर्यंत महा हँडलूमचा उपक्रम
नागपूर ब्यूरो: महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूरच्यावतीने आयोजित “एकतेचे वस्त्र” (Fabric of Unity ) या उपक्रमाचा उमरेड रोडवरील त्यांच्या मुख्य कार्यालयात आज राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त शीतल-तेली- उगले तथा नागपूरचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांच्या हस्ते मोठ्या थाटात उदघाटन झाले. याप्रसंगी त्यांनी प्रत्यक्षात “एकतेचे वस्त्र” विणले. त्याचप्रकारे उपायुक्त ( वस्त्रोद्योग ) विजय रणपिसे, प्रमोद पाटील, डॉ. जनार्दन पक्वान्ने, धर्मेंद्र वर्मा, नरेंद्र दिवटे आणि वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाने देखील आपला सहभाग नोंदविला.
यावेळी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सह संचालक विजय निमजे, झाडे, बाभुळकर, कुंभारे, खानोरकर, फॅशन डिझायनर निधी गांधी, मनिष करंदीकर व कार्यालयातील समस्त कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
2022 हे वर्ष आपण सर्व नागरिक भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा च्या स्वरूपात साजरे करीत आहोत. अनेक थोर महिला व पुरुषांच्या बलिदातून मिळालेले हे स्वंत्र्य फक्त भौगौलिक सीमासुरक्षेपुरते मर्यादित नसून हे स्वतंत्र्य आपली संस्कृती, कला आणि सामर्थ्याचे संवर्धन करण्यासाठी आपल्या पिढीला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे.
पारतंत्र्याच्या काळात सर्व स्वाभिमानी भारतीयांनी विदेशी कापडाची होळी करून मिळवलेले स्वातंत्र्य, आजच्या भारतीय नागरिकांनी, स्वदेशी वस्त्रांची निर्मिती करून अजरामर करणे हे आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी अधिक समर्पक ठरेल.
या करिता तसेच जागतिक वारसा लाभलेल्या विणकरांच्या आणि हातमागावर विणलेल्या वस्त्रावर चित्रकारी करणाºया कलाकारांच्या मेहनतीला जागतिक पटलावर पोहोचविणे व विकणरांच्या सृजनशीलतेला मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने ‘एकतेचे वस्त्र’ (फॅब्रिक ऑफ युनिटी) विणण्याचा अभिनव उपक्रम महा हॅँडलूम ने हाती घेतला आहे.
वस्त्रोद्योग आयुक्त व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. च्या कार्यकारी संचालक शीतल तेली-उगले यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि हातमागावर काही धागे विणून या एकतेच्या वस्त्राच्या निर्मितीत आपले अमूल्य योगदान द्यावे. जागतिक वारसा दिनापासून स्वतंत्र्यदिनापर्यंत (18 एप्रिल ते 15 ऑगस्ट 2022) चालणाºया या उपक्रमातून स्वत: विणकर नसलेल्या नागरिकांकडून विक्रमी लांबीच्या वस्त्राची हातमागावर निर्मिती करण्याचा महा हॅँडलूम चा मानस आहे.
हातमागावर विणकरांनी लावलेला ताणा आणि नागरिकांच्या सहभागातून विणलेला बाणा, यातून निर्माण होणारे वस्त्र विविधतेने नटलेल्या प्राचीन भारतीय हातमाग संस्कृतीचे प्रतीक ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्या सहभागाने त्या सर्व विणकरांचा आणि वस्त्र संस्कृतीशी निगडीत कलाकरांचा मानसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यास व या कलेमागील कष्टांची जाणीव सामान्य जनतेला करून देण्यास फार मोठी मदत मिळणार आहे.
यासाठी हातमागावर काही धागे विणण्याकरिता महा हॅँडलूम च्या उमरेड रोड वरील शोरूम मध्ये, आपल्या सर्व मित्र परिवारासहित भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच स्वयंसेवी संस्था, उद्योग घटक, शैक्षणिक वा सामाजिक संस्था, लहान मोठी मंडळे इत्यादी सर्वांचा सुद्धा आमंत्रित केले आहे. 18 एप्रिल पासून दररोज संध्याकाळी 3 ते 7 या वेळेत शोरूम ला उपक्रम व्यवस्थापक देखील उपस्थित असतील. संस्था किंवा कुळल्याही प्रकाराच्या ग्रुप ने येण्या आधी दूरध्वनी वर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. यामुळे भेटीचे नियोजन करण्यास मदत होईल. अधिक माहिती करीता खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल- 9823112989/8329939380